साडीपुराण

Published on by अनिश्का

फेसबुक वर मी सायली राज्याध्यक्ष यांचं , " साडी आणि बरंच काही " हे पेज फॉलो करते. त्यांच्या लिखाणाची मी अक्षरशः फॅन आहे. 
आता मी इतकं पाल्हाळ लावलंय साड्यांवरून तर आजचा माझा विषय साडी आहे हे सूज्ञ वाचकांच्या लक्षात आलंच असेल. 
तर...... गजऱ्या प्रमाणेच साडी हा ही स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी 1760 साड्या प्रत्येकी कडे असतातच पण तरी दर फंक्शन ला, " शी बाबा, काहीच नाही माझ्याकडे" हे वाक्य 100 पैकी 99.99% बायकांचे असतेच. 
मला साड्यांच्या प्रकार , पोत , संस्कृती  याबद्दल फारसं नॉलेज नाही. पण साड्या व त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी मात्र पुष्कळ आहेत. 
आठवणींची सुरुवात अगदी सुरुवातीपासून म्हणजे माझ्या पणजी आजी पासून करते. 
माझ्या पणजी तिला आम्ही बाय म्हणायचो. तर बाय च लग्न 1927 की 1928 साली झालं. तिच्या लग्नातील शालूमध्ये खऱ्या सोन्याच्या तारा गुंफलेल्या होत्या. शालू ची किंमत होती ,60 रुपये. 
मला आजोबांनी ही गोष्ट सांगितली तेव्हा मी जोरात हसलेेले. आजी यावर म्हणलेली , " अग खरंच, पूर्वी 50 पैसे किमतीला ही साड्या मिळत असत. आणि तेव्हा 60 रुपयांचा शालू म्हणजे आजचे 25-30000 असतील ना. माझ्या लग्नात तर 30 रुपयांचा शालू होता. " 
हे म्हणून तीने आजोबांकडे पाहिलं हळूच. आणि आजोबाही हसले, हळूच ! 
आजीचा हा टोमणा होता आणि तो आजोबांना हे मला माझं लग्न झाल्यावर ही गोष्ट आठवून कळलं..... आणि आजोबा गालात का हसले हे ही !
1975 च्या सुमारास आजोबा काश्मीर , दुबई अश्या ठिकाणी नोकरी निमित्त फिरले होते. तिथून त्यांनी आजीसाठी खुप साड्या आणलेल्या. दुबई वरून चायना सिल्क ज्यांना इकडे इटालियन क्रेप म्हणतात हल्ली. आणि काश्मीर वरून शालू.... 
त्यापैकी 3-4 ज्या इटालियन क्रेप्स होत्या त्यातली एक माझ्या मम्मी कडे , एक मावशी कडे , एक माझ्याकडे आहे... मी माझ्या लग्नाआधी आजोबांकडून मागून घेतलेली. ती नेसल्यावर आजही  मला लहानपणी आजीने जवळ घेतल्यावर जो गंध यायचा तोच गंध, स्पर्श जाणवतो. 
काश्मीर चे शालू मात्र खराब झाले,विरून गेले. 
आजीची एक अजून जांभळ्या पांढऱ्या आणि सोनेरी चौकड्यांची सिल्क ची साडी होती. त्यावर सोनेरी बुट्टे होते. आणि सोनेरी तारांनी विणलेली बॉर्डर. इतकी आवडलेली ती साडी मला. 
ती साडी मी आणलेली माझ्यासाठी. पण ती नेसताना अचानक सर्वकडून फाटायला लागली. मला वाईट ही वाटलेलं तेव्हा. 
माझी आजी साडीच्या पदराला एकही पिन नाही लावायची. पण तिचा पदर कधी एक इंचभर ही इकडे तिकडे सरकलाय असं आठवत नाही. 
माझी मम्मी ही साड्या अगदी निगुतीने सांभाळते. शिक्षिका असल्याने तिला शाळेत साड्याच नेसाव्या लागतात. तिच्याकडे तर साड्यांच्या अक्षरशः खजिना आहे. 
बाबा असताना तिच्याकडे मस्त मस्त सिल्क च्या साड्या होत्या. गेली दहा वर्षे तीने सिल्क वापरणं कमी केलंय. पण प्रिंटेड साड्या खूप आहेत... पण तरी तिचा माझ्या काही साड्यांवर डोळा आहे आणि माझा तिच्या साड्यांवर !
साधारणपणे 20 वर्षापूर्वी तिला बाबांनी एक कॉटन मध्ये साडी घेतलेली. गडद केशरी अंग, त्यावर मोठे सोनेरी चौकडे, गडद हिरवा पदर ,त्यावर मोठे मोठे सोनेरी आणि गडद राणी कलर चे बुट्टे आणि राणी कलर ची लहानशी बॉर्डर ! आहाहा..... आजही ती साडी 20 वर्ष जुनी आहे असं कोणी म्हणणार नाही इतकी फ्रेश दिसते. आम्ही गमतीने या साडीला, " जय महाराष्ट्र साडी " म्हणतो. ती साडी मी हट्टाने मागून घेतलीय तिच्याकडून. 

मला स्वतःला हल्लीच्या डिझायनर साड्या आवडत नाहीत. मला पारंपरिक, वेगवेगळ्या प्रदेशांची खासियत असलेल्या साड्या जास्त आवडतात. माझ्याकडे पैठणी, बांधणी, गढवाल, उपडा सिल्क, मदुराई सिल्क, महेश्वरी , साऊथ वरून माझ्या मित्र - मैत्रिणींनी गिफ्ट केलेल्या सिल्क साड्या, लग्नातली पिवळी प्युअर सिल्क, बनारसी शालू, कलकत्ता कॉटन अश्या बऱ्याचशा साड्या आहेत. प्रिंटेड  आणि डिझायनर ही आहेत. 
पण गम्मत म्हणजे मी साड्या फार कमी नसते. म्हणजे लग्नानंतर मी 2 वर्ष हौशीने साड्या नसल्या. पण मुलीचा जन्म झाल्यानंतर साड्या नेसणे कमी केलेय. सध्या त्या माझ्या वॉर्डरोब ची शान वाढवतायत. 
आज अचानक कुठल्यातरी मराठी चॅनेल वर एक होस्ट आपल्या शो मध्ये एक पैठणी नामक कविता म्हणत होती. ही कविता मला 9 वित असताना मराठी पाठ्यपुस्तकात होती. मला खूप आवडायची कविता. 

पैठणी - शांता शेळके

फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे 
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन 
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी 
रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये 
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती 
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुष्म वास
ओळखीची.. अनोळखीची..
जाणीव गुढ़ आहे त्यास 

धूर कापूर उदबत्यांतून 
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन..
माखली बोटे 
पैठणीला केव्हा पुसली 
शेवंतीची चमेलीची 
आरास पदराआडून हसली 

वर्षामागुन वर्षे गेली 
संसाराचा सराव झाला 
नवा कोरा कडक पोत 
एक मऊपणा ल्याला 
पैठणीच्या घडीघडीतून 
अवघे आयुष्य उलगडत गेले 
सौभाग्य मरण आले 
आजीचे माझ्या सोने झाले

कधीतरी ही पैठणी 
मी धरते ऊरी कवळुन 
मऊ रेशमी स्पर्शामध्ये 
आजी भेटते मला जवळुन 
मधली वर्षे गळुन पडतात 
कालपटाचा जुळतो धागा 
पैठणीच्या चौकड्यानो 
आजीला माझ्या कुशल सांगा

आवडली ना सर्वांना ही कविता??? 

त्यावरूनच मला आज सर्व जुन्या आठवणी येऊ लागल्या आणि हा लेख लिहायचं नक्की केलं. 


माझ्याकडे मम्मी , आजी , पणजी यांच्या असंख्य आठवणी आहेत.  कधीकधी विचार करते रेहा ला माझ्या साडयांपैकी कुठली साडी आवडेल??? आवडेल की नाही??? तिला माझी आठवण येईल असं काय दिलं जाईल माझ्याकडून???? कोणास ठाऊक.......  
पण माझा ही जीव सर्व टिप्पीकल बायकांप्रमाणे वेगवेगळ्या साड्यांमध्ये गुंतलेला आहे. 
आजही साडीच्या दुकानासमोरून पास होताना नजर डिसप्ले ला लावलेल्या साड्यांभोवती भिरभिरत असते. 
माहीत असतं, मी साड्या नेसत नाही तरी ," किंमत विचारून येऊ का रे?? " अशी कळकळीची विंनती नवऱ्याला केलीच जाते. 
आणि ," माझ्याकडे नेसायला काहीच नाही ". हा प्रसिद्ध डायलॉग ही नवऱ्याला दर दोन महिन्यातून एकदा ऐकावाच लागतो. 

To be informed of the latest articles, subscribe:
Comment on this post