चित्रं

Published on by अनिश्का

लहानपणापासून मला चित्र काढायची आवड होती. पर्या , निसर्ग, डोंगर ,नद्या सर्व, अगदी सर्व प्रकारची चित्र मला आवडायची. अभ्यासापेक्षा मी चित्र च जास्त काढायचे.

आई किती ओरडायची..... अभ्यासाचा वेळ चित्रात घालवू नको म्हणून पण आईचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचायचा कुठे?? मी तर दंग असायचे रेषा ,रंग , वेगवेगळ्या आकारांमध्ये! या वेडापायी कित्येकदा मार ही खाल्लाय.....

मोठी होत गेले तसं चित्रांचं वेड ही वाढत गेलं. पण करियर आर्टिस्ट म्हणून करायचं असल्याने आई ची भुणभुण कमी झालेली मात्र. 12 वि नंतर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट लाच ऍडमिशन घ्यायचं हे ही माझं ठरवून झालेलं. चित्र , मॉडर्न आर्ट हे माझं पॅशन होतं.

आजवर मी खूप छान छान चित्र काढून स्वतःचा पोर्टफोलिओ बनवलेला. कोणी पाहुणे वगैरे घरी आले की आई अगदी कौतुकाने सर्वाना माझी चित्रं दाखवायची. एकंदरीत मस्त चाललेलं माझं आयुष्य.

12 वीची परीक्षा झाल्यानंतर जे. जे. च्या एंट्रन्स एक्झाम साठी क्लासेस जॉईन केले. त्यात मला एक माझ्यासारखीच मैत्रीण भेटली.. राधा तिचं नाव.. एकच आठवड्यात आमची खूप मस्त फ्रेंडशिप झाली.

एकदा राधेचा भाऊ तिला क्लास वरून घ्यायला आलेला. राधाने त्याची माझ्याशी ओळख करून दिली. तो 6 फूट उंच होता. आणि हसल्यावर त्याचा एक जोडदात खूप क्युट दिसत होता.

त्या दिवसापासून माझ्या मनात एक नवीन चित्र आकार घेऊ लागलं. कुठलं???? प्रेम की आकर्षणाच???? माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल होऊ घातलेला.... कळत होतं ते मला... मी सतत त्याच्याच विचारात गुंतलेले असायचे. क्लास सुटल्यावर मी नकळत त्याची वाट पाहू लागले, चित्र सोबतीला होतीच पण ही नवीन फिलिंग पण हवीहवीशी वाटू लागलेली..... गॉश आय वॉज इन लव्ह!!!!!

हळूहळू कॉलेज चालू झालं. असाईनमेंट्स , लेक्चर या मध्ये दिवस भराभर निघून जात होते. कधीतरी तो रस्त्यात दिसायचा. ओळखीचं हसायचा. एकाच एरिया मध्ये आम्ही दोघेही राहायचो, सो मला खूपदा तो दिसायचाच....

मग हळूहळू ओळख रस्त्यात थांबून बोलण्यापर्यंत वाढली. मग आम्ही नंबर पण एक्स्चेंज केले आमचे. माझ्यासाठी तर चित्र आणि तो या दोनच गोष्टी जणू अस्तित्वात होत्या. मी त्याला दर दोन दिवसांनी फोन करायचे. आम्ही खूप बोलायचो. मी त्याच्या फोन्स ची ही वाट बघायचे. जे कधी आलेच नाहीत !.....

मला खूप वाटायचं की त्याने ही मला फोन करावा , वॉट्सप , व्हिडीओ कॉल काहीतरी करावं.... पण छे! राधाला बोलून उपयोग नव्हता कारण तिला मी हे सांगितलं नव्हतं. एक दिवस मी ठरवलं की , सांगूनच टाकूया आज त्याला काय ते. मला त्या विचाराने जरा बरं वाटलं. मग उद्या काय घालू त्याला भेटायला जाताना , काय आणि कसं बोलू हा विचार करतच मी झोपले.

रात्री मला अचानक कसला तरी आवाज येऊ लागला, हालचाल जाणवू लागली, लाईट्स लागले तशी मी जागी झाले. बाबा आई ला उठवत होते, रडवेले झालेले, " सोना जा शेजऱ्याच्या काकांना बोलव लवकर.......ही बघ न कसं करतेय,, उठ न गं.... उठ न!!! आई कधीच न उठण्यासाठी झोपी गेलेली. दोन मिनिटांचा खेळ फक्त.

समोर झोपलेली आई झोपली नसून ती गेलीय हे कितीतरी वेळ खरंच वाटत नव्हतं. सकाळी 9 वाजता तिला अंत्यविधी साठी घेऊन गेले. किती पटकन झालं सर्व, कसं झालं , काही कळलंच नाही. सर्व नातेवाईक धीर देऊन गेले त्यांच्या त्यांच्या घरी. मावशी थांबली. पण 13 दिवस झाल्यावर तीही तिच्या घरी.

राहिलो मी आणि बाबा. आमचं लहानसं घर अजून रिकामं वाटू लागलं. आता घरची जबाबदारी , मुखत्वे किचन ची जबाबदारी माझ्यावर आली. मी आपलं नेट वर किंवा पुस्तक वाचून जे बनवायचे ते बाबा निमूट खायचे. खूप शांत झालेले ते. मी अजून 15 दिवस घरी थांबणार होते. राधा रोज फोन करायची , कॉलेज मधल्या असाईनमेंट्स चे फोटो वॉट्सअप्प वर पाठवायची. दर दोन दिवसात भेटून जायची. महिना लागला मला नॉर्मल ला यायला.

मी कॉलेज ला जाऊ लागले होते परत. इतक्या दिवसात मला त्याची आठवण आली बऱ्याचदा. पण नंतर लक्षात आलं की त्याचा फोन किंवा मेसेज आला नाही इतकं झालं पण ! एकदा असच इन्स्टाग्राम चेक करताना मला न्यूज फीड मध्ये त्याचा फोटो दिसला. कोणतरी मुलगी होती अगदी जवळ बसलेली. दोघे खुश दिसत होते अगदी. आणि फोटो ला कॅप्शन दिलं होतं, " मी विथ माय लव्ह " !

दोन मिनिटं गेले मला काय आहे ते कळायला. पण का कोणास ठाऊक मला रडायला आलंच नाही ! फेसबुक वरून लॉग ऑफ करून मी माझा ड्रॉवर उघडला. एक महिन्याचा बॅकलॉग होता साठलेला. एक असाईनमेंट काढली जी अर्धवट होती.

पण आता मला घाई नव्हती कारण सबमिशन डेट केव्हाच उलटून गेलेली !

To be informed of the latest articles, subscribe:
Comment on this post